तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली.