विलापगीत 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
4 त्याने वैर्याप्रमाणे आपले धनुष्य वाकवले आहे, तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे; दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहेत; त्याने सीयोनकन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे.
4 त्याने शत्रूंप्रमाणे आमच्या दिशेने आपला धनुष्य वाकविला आहे. त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आम्हावर बाण चालविण्यास आपल्या हाताने नेम धरिला आहे. त्याच्या दृष्टीस बहूमूल्य लोकांची त्याने हत्या केली. सियोनकन्येच्या तंबूवर त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे.
4 शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा संहार केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे.
“हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्राएल व यहूदा ह्यांत जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्न करा. ह्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आमच्यावर केली आहे, ती फार मोठी आहे.”
कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.
म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.
‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’
तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”
यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”
“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.
ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”
त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.
प्रभू वैर्यासारखा झाला आहे; त्याने इस्राएलास गिळून टाकले आहे; त्याने त्याचे सर्व महाल गिळून टाकले आहेत, त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे.
परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.
ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.
“हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणार्या वस्तू, त्यांच्या जिवाचा इष्टविषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्यांच्यापासून हरण करीन;
अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील, की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे.
जो दूर असेल तो मरीने मरेल; जो जवळ असेल तो तलवारीने पडेल; ह्यांतूनही जो निभावेल तो दुष्काळाने मरेल; अशी मी त्यांच्यावरच्या माझ्या संतापाची परिपूर्ती करीन.
परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे; परमेश्वर आपल्या विरोध्यांचे पारिपत्य करणारा आहे; तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवतो.
त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.