यिर्मया 29:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
14 परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.
14 परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.
14 याहवेह जाहीर करतात, “मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.
हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.
कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.
मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही; ‘शून्य स्थळी मला शोधा,’ असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही; नीतिमत्ता सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे.
परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.
परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल.
कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”
परमेश्वर असे म्हणतो, “तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर; कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल; ते शत्रूंच्या देशांतून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो.
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!
ह्या दुष्ट वंशाचे अवशिष्ट राहिलेले ज्या ज्या स्थळी मी हाकून लावले त्या त्या स्थळी जे बाकी उरतील ते जीवनाऐवजी मरण पसंत करतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.
त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”
मी तुझ्यापुढे मांडलेल्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील, आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालवून देईल तेथे तू ह्या गोष्टींचे स्मरण करशील,
तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील.
तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील; तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करील आणि तुला अधिक बहुगुणित करील.