Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

जखर्‍या 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


प्रमुख याजकासाठी निर्मळ वस्त्रे

1 नंतर प्रमुख याजक यहोशुआ हा याहवेहच्या दूतापुढे उभा असल्याचे दूताने मला दाखविले आणि सैतान ही तिथे दूताच्या उजव्या बाजूला होता आणि तो यहोशुआवर आरोप करीत होता.

2 तेव्हा याहवेह सैतानाला म्हणाले, “अरे सैताना, याहवेह तुला धमकावितात! यरुशलेमची निवड करणारे याहवेह तुला धमकावितात! अग्नीतून बाहेर ओढून काढलेल्या जळत्या कोलितासारखा हा मनुष्य नाही का?”

3 याहवेहच्या दूतासमोर उभ्या असलेल्या यहोशुआची वस्त्रे घाणेरडी होती.

4 तेव्हा तिथे उभे असलेल्यांना स्वर्गदूत म्हणाला, “त्याची घाणेरडी वस्त्रे काढा.” मग यहोशुआला तो म्हणाला, “पाहा, मी तुझी पापे दूर केली आहेत आणि आता मी तुला ही महायाजकाची वस्त्रे घालीत आहे.”

5 मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा.” तेव्हा याहवेहचा स्वर्गदूत तिथे उभा असताना त्यांनी त्याच्या डोक्याला एक स्वच्छ फेटा बांधला व वस्त्रे चढविली.

6 नंतर याहवेहच्या दूताने यहोशुआवर ही जबाबदारी सोपविली:

7 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘जर तू आज्ञाधारकपणे माझ्या मार्गांनी चालशील, तर तू माझ्या भवनावर शासन करशील आणि माझ्या न्यायमंदिरावर अधिकार चालवशील. ते पवित्र ठेवावेस म्हणून मी ते तुझ्या ताब्यात देईन; आणि इथे उभे असलेल्यांच्या बरोबरीने तू स्थान ग्रहण करशील.

8 “ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे.

9 पाहा, मी यहोशुआसमोर एक दगड ठेवला आहे! या दगडाला सात नेत्र आहेत, मी त्यावर एक शिलालेख कोरणार आहे आणि या देशाची पापे एका दिवसात दूर करेन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

10 “ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्‍यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan