गीतरत्न 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 रात्रभर माझ्या अंथरुणावर मी त्याला शोधत होते ज्याच्यावर माझे हृदय प्रेम करते; मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही. 2 मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही. 3 जे पहारेकरी नगरात गस्त घालतात त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?” 4 पहारेकर्यांपासून जराशी दूर गेले आणि ज्यावर माझे हृदय प्रीती करते तो मला सापडला मी त्याला बिलगले आणि माझ्या आईच्या घरी, जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणेपर्यंत त्याला जाऊ दिले नाही. 5 यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, त्याची इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका. 6 हा धुराच्या स्तंभासारखे व्यापाऱ्यांच्या सर्व सुगंधित पदार्थांनी, ऊद आणि गंधरस यांनी सुगंधित, असा रानातून हा कोण येत आहे? 7 पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे. 8 ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे. 9 शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे. 10 त्याचे खांब चांदीचे आहेत, त्याचे तळ सोन्याचे आहे. त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट. 11 अहो सीयोनच्या कन्यांनो, बाहेर या आणि पाहा, शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.