Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गीतरत्न 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


नायिका

1 मी शारोनाचा गुलाब आहे, खोर्‍यातील कमळ आहे.


नायक

2 खरेच, काट्यांमध्ये कमळ तशी इतर तरुणींमध्ये माझी प्रिया आहे.


नायिका

3 जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते.

4 त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे, त्याच्या प्रेमाचा ध्वज माझ्यावर असावा.

5 मनुक्यांनी मला बळ द्या, सफरचंदांनी मला ताजेतवाने करा, कारण प्रेमात मी दुर्बल झाले आहे.

6 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो.

7 यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, त्याची इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.

8 ऐका! माझ्या प्रियांनो! पाहा! तो येत आहे, डोंगरामधून उड्या मारत, टेकड्यांवरून बागडत येत आहे.

9 माझा प्रियकर हरिणीसारखा किंवा तिच्या वत्सासारखा आहे. पाहा, तो तिथे आमच्या भिंतीआड उभा राहून, खिडक्यांतून न्याहळत आहे, जाळीतून डोकावीत आहे.

10 माझा प्रियतम मला म्हणाला, “माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.

11 पाहा! हिवाळा संपला आहे; आता पाऊससुद्धा होऊन गेला.

12 पृथ्वीवर फुले उमलली आहेत; गाण्याचा ऋतू आला आहे, कबुतरांचे गीत आमच्या देशात ऐकू येत आहे.

13 अंजिराच्या झाडाची फळे लागली आहेत; आणि द्राक्षवेलींच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. ऊठ, ये, माझ्या प्रिये; माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.”


नायक

14 डोंगराच्या कपारीत, कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा स्वर ऐकू दे; कारण तुझा स्वर गोड आणि तुझा चेहरा मनोहर आहे.

15 कोल्हे व लहान खोकडे, जे द्राक्षमळ्यांची नासधूस करतात त्यांना आमच्यासाठी पकडा, कारण आमच्या द्राक्षमळ्यात आता बहर आला आहे.


नायिका

16 माझा प्रियतम माझा, आणि मी त्याची आहे; कमळांमध्ये तो आपला कळप चारीत आहे.

17 दिवस संपेपर्यंत आणि सावली जाईपर्यंत, खडतर पर्वतावरच्या हरिणांसारखा किंवा लहान वत्सासारखा हे प्रियतमा, माझ्याकडे परत ये.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan