Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

रोमकरांस 7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


नियमापासून सुटका, ख्रिस्ताला जडून राहणे

1 बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांना नियमशास्त्र माहीत आहे, त्यांच्याबरोबर मी बोलतो, एखादी व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राचे प्रभुत्व तिच्यावर राहते हे तुम्हाला समजत नाही काय?

2 उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत त्याला बांधलेली असते, परंतु जर तिचा पती मरण पावला, तर ती ज्या नियमाद्वारे त्याला बांधलेली असते त्यापासून मुक्त होते.

3 पती जिवंत असताना, तिने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.

4 त्याप्रमाणे बंधू व भगिनींनो, तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मृत झाले आहात, म्हणून तुम्ही दुसर्‍याचे, जो मरणातून उठविला गेला त्याचे व्हावे यासाठी की तुम्ही परमेश्वरासाठी फळ द्यावे.

5 आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या.

6 परंतु आता ज्याने आपल्याला बांधून ठेवले होते, त्याला आपण मेलेले आहोत, म्हणून नियमशास्त्रातील जुन्या लेखाप्रमाणे नव्हे, तर एका नव्या आत्म्याच्या मार्गाने सेवा करू या.


नियम आणि पाप

7 तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,” असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते.

8 परंतु पापाने नियमांचा फायदा घेऊन संधी साधून माझ्यामध्ये सर्वप्रकारचा लोभ उत्पन्न केला; कारण नियमांशिवाय पाप मृत आहे.

9 अशी वेळ होती जेव्हा मी नियमशास्त्राशिवाय जिवंत होतो; परंतु आज्ञा आल्यावर, पाप जीवित झाले आणि मी मरण पावलो.

10 वास्तविक ज्या आज्ञांनी जीवन द्यावयास पाहिजे होते, त्याच आज्ञांनी मरण आले हे मला आढळून आले.

11 पापाने आज्ञांच्या योगे गैरफायदा घेऊन मला फसविले, आणि आज्ञांच्या द्वारे मला ठार मारले.

12 वास्तविक नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, न्याययुक्त आणि उत्तम आहेत.

13 परंतु जे उत्तम ते माझ्या मरणास कारणीभूत झाले काय? असे नक्कीच नाही. पाप ते पाप दिसावे, आणि चांगल्याद्वारे पापाने माझ्यामध्ये मृत्यू उत्पन्न केला, यासाठी की आज्ञेद्वारे पाप हे पराकोटीचे पाप दिसून यावे.

14 नियमशास्त्र आध्यात्मिक आहे; हे आपल्याला माहीत आहे. पण मी तर पापाला गुलाम म्हणून विकलेला दैहिक प्राणी आहे.

15 मी काय करतो हे मला समजत नाही. कारण जे मला करावेसे वाटते, ते मी करत नाही, जे करण्याचा मला तिटकारा येतो, तेच मी करीत असतो.

16 जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.

17 कारण या गोष्टी करणारा मी स्वतः नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेले पाप करते.

18 माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही.

19 चांगले करावे असे मला वाटते, पण मी ते करीत नाही, परंतु वाईट जे मला करावेसे वाटत नाही ते मी करीत राहतो.

20 आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते.

21 योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते.

22 परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो.

23 पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.

24 मी किती कष्टी मनुष्य! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल?

25 परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan