रोमकरांस 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीपरमेश्वराचा विश्वासूपणा 1 तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का? 2 सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते. 3 जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का? 4 नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.” 5 परंतु जर आमच्या अनीतीमुळे परमेश्वराचे नीतिमत्व अधिक स्पष्ट होत असेल तर आम्ही काय म्हणावे? परमेश्वर आपल्यावर क्रोध आणतात तर ते अन्यायी आहेत काय? (मी तर हे मानवी रीतीने बोलतो.) 6 पण असे कदापि नाही! कारण मग परमेश्वर जगाचा न्याय कसा करतील? 7 कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?” 8 किंवा, “चला आपण वाईट करू म्हणजे यामधून काही चांगले निष्पन्न होईल” आम्ही असेच म्हणालो, असा काहीजण आमच्यावर आरोप लावतात. त्यांची दंडाज्ञा तर योग्यच आहे! नीतिमान कोणीही नाही 9 तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही आधी यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे. 10 असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; 11 समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. 12 प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.” 13 “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.” 14 “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.” 15 “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात, 16 दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात, 17 आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.” 18 “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.” 19 आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल. 20 नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते. विश्वासाद्वारे नीतिमत्त्व 21 पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे. 22 परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही, 23 कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, 24 आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे. 25 ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे. 26 आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्यांना नीतिमान म्हणून घोषित करावे. 27 तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे. 28 आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही. 29 किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच, 30 परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात. 31 आता आपण नियमशास्त्राला विश्वासाने निरुपयोगी करतो का? मुळीच नाही! उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.