रोमकरांस 16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीव्यक्तिगत सदिच्छा 1 किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो. 2 मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे. 3 प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा. 4 त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत. 5 त्यांच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला. 6 जिने तुम्हासाठी खूप परिश्रम केले त्या मरीयेलाही सदिच्छा सांगा. 7 माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते. 8 प्रभूमध्ये प्रिय मित्र आंप्लियात याला माझ्या सदिच्छा कळवा. 9 तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा. 10 अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा. तसेच अरिस्थबूलच्या घरातील सर्वांना माझ्या सदिच्छा कळवा. 11 माझा नातेवाईक हेरोदियोन याला सदिच्छा द्या. नार्सिसाच्या घरातील जे प्रभूमध्ये आहेत त्यांना सदिच्छा कळवा. 12 त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा. प्रिय मैत्रीण पर्सिस, हिला सदिच्छा कळवा. तिने प्रभूमध्ये अतिशय कष्ट घेतले. 13 प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा. 14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रोबास, हेर्मेस यांना व त्यांच्याबरोबर असणार्या सर्व बंधू व भगिनींना सदिच्छा कळवा. 15 फिललग, युलिया, नीरिय व त्याची बहीण, ओलुंपास, व त्यांच्या बरोबरच्या सर्व पवित्र जणांना सदिच्छा कळवा. 16 एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सदिच्छा कळवितात. 17 आता बंधूंनो व भगिनींनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की, जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फूटी व अडथळे आणणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा; आणि त्यांच्यापासून दूर राहा. 18 कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात. 19 तुमच्या आज्ञापालनाबद्दल प्रत्येकाने ऐकले आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो; तरी तुम्ही जे उत्तम त्यासंबंधाने सुज्ञ आणि जे वाईट त्याविषयी अज्ञानी असावे, अशी माझी इच्छा आहे. 20 शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडून टाकील. आपल्या प्रभू येशूंची कृपा तुम्हावर असो. 21 माझा सहकारी तीमथ्य, तसेच माझे नातेवाईक लूक्य, यासोन आणि सोसिपतेर, हे तुम्हाला आपल्या सदिच्छा कळवीत आहेत. 22 हे पत्र लिहिणारा, मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला सदिच्छा देत आहे. 23 गायस, जो माझे आणि इथे त्याच्या घरी जमणाऱ्या मंडळीचे आदरातिथ्य करतो, तो तुम्हाला त्याच्या सदिच्छा कळवितो. या शहराचा खजिनदार एरास्त, तसेच आपला विश्वासू बंधू क्किर्त यांच्याही तुम्हाला सदिच्छा. 24 आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा तुम्हा सर्वांवर असो. आमेन. 25 माझ्या शुभवार्तेनुसार तो आता तुम्हाला स्थिर करेल व ज्या येशू ख्रिस्ताचा संदेश मी घोषित केला त्यानुसार जे रहस्य अनंत काळापूर्वी गुपित होते ते आता प्रकट झाले आहे. 26 पण आता संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे प्रकट आणि जाहीर झालेली सार्वकालिक परमेश्वराची आज्ञा यांना अनुसरून सर्व गैरयहूदी लोकांनी विश्वासाने आज्ञापालन करावे. 27 आता केवळ एकच ज्ञानी परमेश्वर, त्यांना येशू ख्रिस्त यांच्याद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.