Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

रोमकरांस 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आपण जे बळकट आहोत, ते आम्ही अशक्तांना भार वाहण्यास मदत केली पाहिजे, केवळ आपण स्वतःलाच संतुष्ट करू नये.

2 आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्‍यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या.

3 कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्‍याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.”

4 कारण जे काही पूर्वी लिहिण्यात आले, ते सर्व आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून लिहिले गेले, यासाठी की धीर धरून शास्त्रलेखापासून मिळणार्‍या प्रोत्साहनाद्वारे आपण आपल्या आशेला दृढ धरून राहवे.

5 धीर व प्रोत्साहन देणारा परमेश्वर तुम्हाला एकमेकांबरोबर एकचित्ताने राहण्यास साहाय्य करो. प्रत्येकाने एकमेकांशी ख्रिस्त येशूंच्या ठायी असलेल्या वृत्तीने व विचाराने वागावे,

6 आणि मग आपल्याला एकमनाने व एकसुराने, परमेश्वराचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे गौरव करता येईल.

7 ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्वीकार करा.

8 कारण मी तुम्हाला सांगतो की, ख्रिस्त परमेश्वराचे सत्य प्रस्थापित करण्याकरिता यहूदीयांचे सेवक झाले आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेली अभिवचने पूर्ण करावी,

9 म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.”

10 आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.”

11 आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.”

12 आणि यशायाह संदेष्टा म्हणतो, “इशायाचे मूळ उगवेल, व ते राष्ट्रांचा शासक होण्यास उभे राहतील; गैरयहूदीयांच्या आशा त्यांच्यामध्येच आहेत.”

13 तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.


पौल गैरयहूदीयांचा सेवक

14 माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही स्वतः चांगुलपणाने पूर्ण भरलेले व ज्ञानाने परिपूर्ण आणि एकमेकांना शिकवण्यास पात्र आहात याची मला नक्कीच खात्री आहे.

15 त्यांची तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मी काही गोष्टींबद्दल धीटपणे लिहिले आहे, कारण परमेश्वराने मला कृपा दिली आहे

16 की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.

17 यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो.

18 गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही.

19 चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.

20 जिथे ख्रिस्ताबद्दल अजून कळले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवार्तेचा प्रचार करावा हेच माझे ध्येय होते, यासाठी की मी इतरांनी बांधलेल्या पायावर रचू नये.

21 यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.”

22 यामुळे तुम्हाकडे येण्यास मला अनेकदा अडखळण आले.


रोमला भेट देण्याचा पौलाचा बेत

23 पण आता या प्रांतामध्ये मला काही काम करावयाचे राहिले नाही, आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्याकडे येण्यास मी तयार झालो आहे.

24 कारण स्पेन देशाची सफर करण्याचा माझा मानस आहे. तिकडे जाताना आशा आहे की मी काही काळ तुमच्या सहवासात आनंदाने घालविल्यावर, तुम्ही मला पुन्हा वाटेस लावावे.

25 आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे.

26 कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे.

27 हे त्यांनी अतिशय आनंदाने केले. आपण ॠणी आहोत असे त्यांना वाटते. गैरयहूदीयांना यहूदीयांद्वारे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत, या अद्भुत आध्यात्मिक दानाची अंशतः फेड म्हणून हे भौतिक दान द्यावे, असे त्यांनी ठरविले.

28 ही वर्गणी पोहोचवून त्यांचे हे काम पार पाडल्यानंतर आणि दान त्यांना मिळाल्याची खात्री झाल्यानंतर मी स्पेनकडे जाताना तुम्हाला येऊन भेटेन;

29 आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे.

30 बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी.

31 यहूदीयामधील जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यापासून माझे रक्षण व्हावे आणि मी नेत असलेली वर्गणी यरुशलेम येथील प्रभूच्या लोकांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करा.

32 मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन.

33 आता शांतीचे परमेश्वर तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan