प्रकटी 5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीग्रंथपटाची गुंडाळी आणि कोकरा 1 जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती. 2 एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?” 3 पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता. 4 तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही. 5 पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदाह वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.” 6 मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत. 7 कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली. 8 कोकर्याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत. 9 ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे, 10 तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.” 11 तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते. 12 ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!” 13 मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो!” 14 तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.