Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इफिस येथील मंडळीस

1 “इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतात व जे सोन्याच्या सात समयांमध्ये चालतात, ते असे म्हणतात.

2 तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्‍यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.

3 माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे.

4 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे.

5 तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन.

6 पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करता.

7 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. जो विजय मिळवितो, त्याला मी परमेश्वराच्या स्वर्गलोकात असलेल्या जीवनाच्या वृक्षाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.


स्मुर्णा येथील मंडळी

8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात.

9 मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो.

10 तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.

11 ज्याला ऐकावयास कान आहेत तो आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसर्‍या मरणाची बाधा होणारच नाही.


पर्गमम येथील मंडळीस

12 “पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात:

13 तुम्ही कुठे राहता हे मला ठाऊक आहे, जिथे सैतानाचे आसन आहे तिथे. तुम्ही माझे नाव दृढ धरून राहिला आहात. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जिथे सैतान राहतो, तिथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तुम्ही माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.

14 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध काही गोष्टी आहेत: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाच्या शिक्षणानुसार इस्राएली लोकांपुढे असे अडखळण केले की, जेणे करून त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खावा व लैंगिक अनीती करावी.

15 याचप्रमाणे, निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुमच्यातही आहेत.

16 यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्‍या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.

17 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि ज्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो पांढरा खडाही मी त्या व्यक्तीला देईन, जे तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही माहीत नसेल.


थुवतीरा येथील मंडळी

18 “थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे नेत्र आगीच्या ज्वालेसारखे भेदक आहेत व ज्याचे पाय चकाकत्या कास्यासारखा आहेत, ते परमेश्वराचे पुत्र असे म्हणतात:

19 तुमची सर्व कृत्ये मला ठाऊक आहेत आणि तुमची प्रेमळ वागणूक व विश्वास, तुमची सेवा व धीर ही सर्व मी जाणतो. आणि दिवसेंदिवस या सर्व गुणांमध्ये तुमची होत असलेली प्रगती देखील मला दिसते.

20 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता.

21 मी तिला वेळ दिला, पण आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याचे तिने नाकारले.

22 पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्‍या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन.

23 मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.

24-25 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा.

26 जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन.

27 आणि ते त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्‍या करतील;—

28 ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन.

29 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan