प्रकटी 17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीबाबिलोन व पशूवर स्वार झालेली वेश्या 1 पीडांची वाटी ओतणार्या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन. 2 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.” 3 नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली. 4 त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता. 5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: महान बाबिलोन, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची माता. 6 मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो. 7 तेव्हा देवदूत मला म्हणाले: “तू एवढा आश्चर्यचकित का झालास? ती स्त्री कोण आहे आणि ज्या सात डोक्यांच्या आणि दहा शिंगांच्या पशूवर ती स्वार झाली आहे, तो पशू कोण आहे, याचे रहस्य मी तुला सांगतो. 8 तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार. 9 “हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते. 10 त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल. 11 जो पशू आधी होता, पण आता नाही, तो आठवा राजा असून, सातापैकी एक आहे, नंतर त्याचाही नाश होईल. 12 “त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल. 13 त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील. 14 ते सर्वजण मिळून कोकर्या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.” 15 तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत. 16 तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील. 17 कारण परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनात एक योजना घालेल. आपले सर्व अधिकार परमेश्वराचे वचन पूर्ण होईपर्यंत त्या शेंदरी पशूला देण्याचे ते एकमताने आपसात ठरवतील. 18 तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्या महानगरीचे दर्शक आहे.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.