प्रकटी 16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीपरमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या 1 नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” 2 त्याप्रमाणे, पहिला देवदूत मंदिरातून निघाला. त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या लोकांवर पशूची खूण होती व ज्यांनी त्याच्या मूर्तीला नमन केले होते, अशा प्रत्येकाला चिघळलेले आणि क्लेशदायक फोड आले. 3 दुसर्या देवदूताने आपले वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्राचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्तमय झाले आणि त्यातील सर्व जिवंत प्राणी मरण पावले. 4 तिसर्या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले. 5 मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात. 6 कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.” 7 नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.” 8 मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सर्व माणसांना सूर्याच्या अग्नीने भाजून काढण्याची परवानगी देण्यात आली. 9 माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही. 10 मग पाचव्या देवदूताने आपली वाटी समुद्रातील पशूच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे संपूर्ण राज्य अंधकारमय झाले आणि त्याच्या प्रजाजनांनी असह्य वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या. 11 आपल्या वेदना आणि फोड याबद्दल त्यांनी स्वर्गातील परमेश्वराला शाप दिले. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल पश्चात्ताप करण्याचे त्यांनी नाकारले. 12 सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले. 13 नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले. 14 चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात. 15 “पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.” 16 मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. 17 मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!” 18 मग मेघगर्जना, व आकाश दणाणून सोडणारा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि मानवी इतिहासात कधी झाला नव्हता इतका मोठा व तीव्र स्वरुपाचा भूमिकंप झाला. 19 त्या मोठ्या शहराचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त झाली. महान बाबिलोन नगरीचे परमेश्वराला स्मरण झाले व त्यांनी तिला त्यांचा क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला. 20 प्रत्येक बेट नाहीसे झाले; पर्वत सपाट झाले. 21 प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.