Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


समुद्रातून येणारा पशू

1 तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्‍यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती.

2 हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला.

3 त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक जखम झाल्यासारखे मला दिसले. पण ती प्राणघातक जखम बरी झाली. या चमत्काराने सारे जग आश्चर्यचकित झाले आणि त्या पशूला अनुसरले.

4 त्या अजगराने दुष्ट पशूला अधिकार दिले म्हणून लोक अजगराची आणि त्या दुष्ट पशूचीही उपासना करू लागले. त्यांनी उद्गार काढले, “याच्यासारखा महान कोणी आहे काय? याच्याशी युद्ध करण्यास कोणी समर्थ आहे काय?”

5 त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते.

6 तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्‍या सर्वांची निंदा करीत राहिला.

7 अजगराने त्याला परमेश्वराच्या पवित्र लोकांविरुद्ध लढून त्यांच्यावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य दिले. आणि प्रत्येक वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार दिला.

8 पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.

9 ज्याला ऐकावयास कान आहे, त्या प्रत्येकाने ऐकावे:

10 “जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर ते तुरुंगवासात जातील. जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, तर तलवारीने ते मारले जातील.” परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.


पृथ्वीतून येणारा पशू

11 मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्‍याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता.

12 प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले.

13 त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या.

14 कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.

15 या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्‍या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”

16 त्याने असेही फर्मान काढले की लहान थोर, श्रीमंत व गरीब, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण गोंदून घ्यावी.

17 त्या पहिल्या पशूची खूण किंवा त्याच्या नावाचा सांकेतिक आकडा त्यांच्यावर असल्याशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.

18 हे समजण्यासाठी सुज्ञतेची आवश्यकता आहे. कोणाजवळ अंतर्ज्ञान असेल, तर त्याने त्या पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याच्या नावाची सांकेतिक संख्या आहे. ती संख्या 666 अशी आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan