प्रकटी 11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदोन साक्षीदार 1 मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे. 2 पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील. 3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.” 4 “ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असलेले दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत. 5 आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या शत्रूंना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे. 6 त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. 7 त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करेल आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करेल. 8 ज्या मोठ्या शहराला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त असे म्हटले आहे आणि ज्या शहरात त्यांच्या प्रभूला क्रूसावर खिळण्यात आले होते, त्या शहरातील रस्त्यांवर त्यांची प्रेते पडून राहतील. 9 सर्व लोक, वंश, भाषा आणि राष्ट्रे त्यांची प्रेते साडेतीन दिवस टक लावून पाहतील आणि त्यांना पुरण्यास नकार देतील. 10 उलट, आपला इतका छळ करणार्या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील. 11 पुढे साडेतीन दिवसानंतर परमेश्वरापासून येणारा जीवनदायी श्वास त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला. 12 मग स्वर्गातून एक मोठी वाणी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी ऐकली. ती म्हणाली, “इकडे वर या!” तेव्हा ते आपल्या शत्रूंच्या देखत मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. 13 त्याच घटकेस एक प्रचंड भूमिकंप झाला आणि शहराचा एक दशांश भाग जमीनदोस्त होऊन, सात हजार लोक मरण पावले. तेव्हा भूमिकंपातून वाचलेल्या प्रत्येकाने भयभीत होऊन स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले. 14 दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे. सातवे रणशिंग 15 कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.” 16 तेव्हा परमेश्वरासमोर, आपल्या आसनांवर बसलेल्या चोवीस वडीलजनांनी परमेश्वरापुढे दंडवत करून त्यांची उपासना केली. 17 ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जे आहेत आणि जे होते, कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे. 18 राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, व पृथ्वीचा नाश करणार्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.” 19 तेव्हा स्वर्गात परमेश्वराचे मंदिर उघडण्यात आले आणि मंदिरात असलेला परमेश्वराच्या करारांचा कोश दिसू लागला. विजा चमकू लागल्या, मेघगर्जना आणि गडगडाट होऊ लागला. भूमिकंप झाला आणि गारांचे मोठे वादळ झाले. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.