प्रकटी 10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदेवदूत आणि लहानसा ग्रंथपट 1 मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते. 2 त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला. 3 मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले. 4 त्या सात मेघगर्जनांनी उच्चारलेले शब्द मी लिहून ठेवणार होतो; तेवढ्यात स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली, “थांब, लिहू नकोस. त्यांचे शब्द मोहरबंद कर, आताच ते प्रकट करावयाचे नाहीत.” 5 मग समुद्र व जमीन यावर उभे राहिलेल्या त्या बलवान देवदूताने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचाविला. 6 आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही! 7 पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.” 8 मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.” 9 त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन मी त्याला ती छोटी गुंडाळी मागितली. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ‘ती तुझ्या तोंडात मधासारखी गोड लागेल,’ पण ती गिळल्यावर ती तुझे पोट आंबट करेल.” 10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून छोटी गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली. त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडाला ती मधाप्रमाणे गोड लागली, पण ती गिळल्यावर माझे पोट आंबट झाले. 11 तेव्हा मला सांगण्यात आले, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.