Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 89 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 89
एज्रावंशातील एथानचा एक मासकील

1 मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन; पिढ्यान् पिढ्या मी तुमच्या विश्वसनीयतेची माझ्या मुखाने साक्ष देईन.

2 मी जाहीर करेन की, तुमची प्रीती आणि तुमची दया सर्वकाळ टिकणारी आहेत; तुमचे सत्य स्वर्गामध्ये तुम्ही स्थिर केले आहे.

3 तुम्ही म्हणालात, “माझा निवडलेला सेवक, दावीद, याच्याशी मी एक करार केला आहे; मी शपथ वाहिली आहे की,

4 ‘दावीदाच्या सिंहासनावर त्याचे वंशज अनंतकाळ राज्य करतील आणि पिढ्यान् पिढ्या विराजमान होतील.’ ” सेला

5 याहवेह, सारे गगनमंडळ तुमच्या अद्भुत चमत्कारांची स्तुती करीत आहे. भक्तांच्या सभेत तुमच्या विश्वसनीय पावित्र्याचेही गुणगान केले जाते.

6 कारण याहवेहशी तुलना करता येईल असा स्वर्गात कोण आहे? दिव्यदूतांच्या मंडळात परमेश्वरासमान कोण आहे?

7 सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.

8 हे याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, तुमच्यासारखे समर्थ परमेश्वर दुसरे कोणी आहे का? विश्वासूपणाचे वलय तुमच्याभोवती आहे.

9 भयानक उसळणार्‍या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता; लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता.

10 तुम्ही रहाबास असे जमीनदोस्त केले जसे एखादे शव; तुमच्या शक्तिशाली बाहूने तुम्ही शत्रूंची दाणादाण केली.

11 स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे; कारण तुम्हीच ते आणि त्यामधील सगळे काही प्रस्थापित केले आहे.

12 उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या; ताबोर व हर्मोन पर्वत तुमच्या नामाचा आनंदाने गजर करतात.

13 तुमचे बाहू प्रबळ आहेत; तुमचा हात बळकट आहे, उंचावलेला आहे तुमचा उजवा हात.

14 तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे; करुणामय प्रीती व विश्वसनीयता सतत तुमच्यापुढे चालतात.

15 याहवेह, तुमचा गौरव करण्याचे जे शिकले, आणि जे तुमच्या प्रकाशाच्या सानिध्यात चालतात, ते धन्य होत.

16 तुमच्या नामाची प्रशंसा ते दिवसभर आनंदाने करतात; आणि तुमच्या नीतिमत्तेचा उत्सव साजरा करतात.

17 तुम्हीच त्यांचे गौरव व सामर्थ्य आहात; तुमच्या कृपेद्वारे आमचे शिंग उच्च केले जाईल.

18 खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत, आणि आमचा राजादेखील इस्राएलचे पवित्र परमेश्वरच आहेत.

19 एकदा एका दृष्टान्ताद्वारे तुम्ही आपल्या भक्तांशी बोललात: “एका वीर योद्ध्याला मी सामर्थ्याने परिपूर्ण केले आहे; मी सामान्य लोकातून एक तरुण निवडला आहे;

20 तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.

21 माझे बाहू त्याला स्थिर करतील; निश्चितच माझे हात त्याला बळकट करतील.

22 त्याचे शत्रू त्याला पराजित करू शकणार नाहीत; किंवा दुष्ट लोक त्याला पीडणार नाहीत.

23 मी त्याच्या शत्रूंना त्याच्यासमोर चिरडेन आणि त्याच्या विरोधकांना नष्ट करेन.

24 माझी सत्यता व करुणा त्याजबरोबर राहील; माझ्या नावानेच त्याचे शिंग उंचाविले जाईल.

25 मी त्याला समुद्रावर अधिकार देईन, त्याचा उजवा हात नद्यांवर सत्ता गाजवेल.

26 तो माझा धावा करून म्हणेल, ‘तुम्ही माझे पिता आहात; तुम्ही माझे परमेश्वर, माझ्या तारणाचा खडक आहात.’

27 मी त्याची माझा ज्येष्ठपुत्र म्हणून नेमणूक करेन, आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ राजा करेन.

28 माझ्या करुणामय प्रीतीची छाया त्याजवर सदासर्वकाळ राहील; मी त्याच्याशी केलेल्या कराराचा कधीही अंत होणार नाही.

29 मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन, त्याचे सिंहासन गगनमंडळाच्या अस्तित्वापर्यंत राहील.

30 “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,

31 माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले,

32 मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्‍यांची शिक्षा करेन.

33 पण मी माझी प्रेममयदया त्याच्यापासून कधीही काढून घेणार नाही व माझी सत्यता मी त्यागणार नाही.

34 मी माझा करार मोडणार नाही; मी जे बोललो त्यातील एक शब्दही बदलणार नाही.

35 सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—

36 दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल आणि त्याचे सिंहासन माझ्यासमोर सूर्यासमान काळाच्या अंतापर्यंत राहील.

37 आकाशातील विश्वसनीय साक्षीदार चंद्राप्रमाणे त्याचे सिंहासन युगानुयुग सुस्थिर राहील.” सेला

38 मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात.

39 तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे.

40 त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे.

41 येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो; आणि तो त्याच्या शेजार्‍यांकरिता घृणापात्र झाला आहे.

42 तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे.

43 तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे आणि लढाईत त्याला मदत करण्याचे नाकारले आहे.

44 तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे आणि त्याचे सिंहासन धुळीत टाकले आहे.

45 त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. सेला

46 हे याहवेह, असे कुठवर चालणार? तुम्ही स्वतःला सर्वकाळ लपवून ठेवणार काय? कुठवर तुमचा क्रोधाग्नी भडकत राहणार?

47 माझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे स्मरण करा. तुम्ही मानवाला किती व्यर्थ जीवन जगण्यासाठी निर्माण केले!

48 कोण सर्वकाळ जगेल व ज्याला मरणाचा अनुभव येणार नाही, कोण स्वतःला अधोलोकाच्या सत्तेपासून सोडवू शकेल? सेला

49 हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली?

50 हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू!

51 याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले.

52 याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो! आमेन व आमेन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan