Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 86 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 86
दावीदाची एक प्रार्थना

1 हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या, कारण मी दीन व दरिद्री आहे.

2 माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे; तुमच्यावर भरवसा ठेवणार्‍या सेवकाला वाचवा, तुम्ही माझे परमेश्वर आहात;

3 हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, कारण मी दिवसभर तुमचा धावा करतो.

4 हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या, कारण मी केवळ तुमच्यावरच श्रद्धा ठेवली आहे.

5 हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.

6 याहवेह, माझी प्रार्थना ऐका; तुमच्या कृपेसाठी केलेला माझा धावा ऐका.

7 मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन, कारण तुम्ही मला उत्तर देता.

8 हे प्रभू, सर्व दैवतांमध्ये तुमच्यासारखा परमेश्वर कुठेही नाही; तुमची महत्कृत्ये अतुलनीय आहेत.

9 हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे, तुमच्यासमोर सन्मानाप्रत येतील व तुमची आराधना करतील; तुमच्या पवित्र नामाची थोरवी गातील.

10 कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता; तुम्हीच एकटे परमेश्वर आहात.

11 हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा, म्हणजे तुमच्या विश्वासूपणावर मी भरवसा ठेवेन; मला एकचित्त हृदय प्रदान करा, म्हणजे मी तुमच्या नावाचे भय बाळगेन.

12 माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन; मी तुमच्या नामाला सदासर्वकाळ गौरव देईन.

13 कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता; अधोलोकाच्या तळापासून तुम्ही माझे प्राण सोडविले आहेत.

14 हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात; निर्दयी लोकांची टोळी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे— त्यांना तुमची काहीही कदर नाही.

15 परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.

16 माझ्याकडे वळून मजवर दया करा; आपल्या सेवकाच्या वतीने आपले सामर्थ्य दाखवून द्या; माझे तारण करा, कारण माझ्या आईप्रमाणेच मी देखील तुमची सेवा करतो.

17 तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या, म्हणजे माझे शत्रू ते पाहतील व लज्जित होतील, कारण हे याहवेह, तुम्ही मला साहाय्य केले आणि माझे समाधान केले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan