स्तोत्रसंहिता 83 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 83 एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका; आमच्यासाठी कान बहिरे करू नका, असे अलिप्त राहू नका. 2 पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात, तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे. 3 तुमच्या लोकांविरुद्ध ते कट करतात; तुमच्या प्रिय लोकांविरुद्ध ते कारस्थान करीत आहेत. 4 ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या; त्यांच्या अस्तित्वाची आठवण देखील आपण नष्ट करून टाकू.” 5 एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला; ते सर्व तुमच्याविरुद्ध संघटित झाले आहेत— 6 एदोमी तथा इश्माएली, मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे, 7 गबाल, अम्मोन, व अमालेक, पलेशेथ आणि सोरचे निवासी. 8 अश्शूरही देखील त्यांना सामील झाला आहे की त्याने लोटाच्या वंशजांना सशक्त करावे. सेला 9 पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी, किंवा सिसेरा व किशोन नदीजवळ याबीनांशी व्यवहार केला, तसाच यांच्याशीही करा. 10 ज्यांचा विनाश एनदोर येथे झाला, आणि मग ते भूमीवर पडलेल्या शेणासारखे झाले. 11 त्यांच्या सरदारांना ओरेब व जेब समान होऊ द्या; त्यांच्या अधिपतींना जेबह व सलमुन्ना सारखेच होऊ द्या. 12 ते म्हणाले होते, “चला परमेश्वराची कुरणे आपण हस्तगत करू या.” 13 हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्याने उडणार्या भुशागत त्यांना करा. 14 अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते, 15 आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा, व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा. 16 हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा. 17 ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत; त्यांचा लज्जास्पद नाश होऊ द्या. 18 त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.