स्तोत्रसंहिता 78 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 78 आसाफाचे मासकील. 1 अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्या वचनाकडे कान द्या. 2 मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन; 3 ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे, त्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्या आहेत. 4 आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू. 5 कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली. 6 जेणेकरून येणार्या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे. 7 मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील. 8 ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते. 9 सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी ऐन लढाईच्या दिवशी मागे फिरून पलायन केले. 10 त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आणि त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे जगण्यास नकार दिला. 11 त्यांनी केलेली महत्कार्य, त्यांनी दाखविलेले अद्भुत चमत्कार ते विसरले. 12 त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील सोअनाच्या मैदानावर अद्भुत कृत्ये केली. 13 परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले. 14 दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत. 15 त्यांनी रानात खडक फोडले आणि समुद्राइतके भरपूर पाणी त्यांना दिले. 16 त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले. 17 असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे आणि देवाधिदेवाविरुद्ध पाप करणे सुरूच ठेवले. 18 ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी स्वेच्छेने आपल्या मनात परमेश्वराची परीक्षा घेतली. 19 ते परमेश्वराच्या विरोधात बोलले; ते म्हणाले, “परमेश्वर खरोखर वाळवंटात मेज लावू शकतात का? 20 खरे आहे, त्यांनी खडकावर मारले, आणि पाण्याचे स्त्रोत फुटले, प्रचंड प्रवाह वाहू लागले; पण काय ते आम्हाला भाकरदेखील देऊ शकतात? काय ते आपल्या लोकांना मांस पुरवतील?” 21 जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले; त्यांचा अग्नी याकोबाविरुद्ध पेटला, आणि त्यांचा क्रोध इस्राएलावर भडकला. 22 कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही; ते आपली सुटका करतील असा भरवसा ठेवला नाही. 23 त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली; आणि आकाशाचे दरवाजे उघडले; 24 लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला, त्यांनी स्वर्गातील धान्य त्यांना दिले. 25 मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली; त्यांना खाता येईल तेवढे सर्व अन्न त्यांनी दिले. 26 त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला आणि त्यांच्या सामर्थ्याने दक्षिणेकडील वारा वाहू दिला. 27 त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. 28 त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत, त्यांच्या तंबूच्या सभोवती खाली यावयास लावले. 29 त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले— त्यांनी जे मागितले होते, ते सर्व त्यांना दिले. 30 पण त्यांना जे पाहिजे त्यापासून समाधानी होण्यापूर्वी, जेवण अद्यापही त्यांच्या मुखात असतानाच, 31 परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला; त्यांच्या धष्टपुष्टांस ठार करून, इस्राएलच्या तरुणांना खाली पाडले. 32 इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले; त्यांच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 33 म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले आणि घोर भीतीने त्यांची वर्षे व्यापून टाकली. 34 जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले; ते मनापासून पुन्हा त्यांच्याकडे वळले. 35 परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत आपली सुटका करणारे देवाधिदेव आहेत याची त्यांना आठवण झाली; 36 परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत; त्यांच्या जिभेने ते त्यांच्याशी लबाड बोलत; 37 त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती; त्यांच्याशी केलेल्या कराराशी ते विश्वासू राहिले नाहीत. 38 तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले; त्यांच्या पापांची त्यांनी क्षमा केली आणि त्या सर्वांचाच नाश केला नाही; वारंवार त्यांनी आपला क्रोध आवरला आणि तो पराकोटीला जाऊ दिला नाही. 39 कारण ते केवळ वार्याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे मर्त्य मानव आहेत, याचे त्यांना स्मरण झाले. 40 त्यांनी कितीदा तरी त्यांच्याविरुद्ध बंड केले आणि अरण्यात त्यांना दुःख दिले! 41 पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली; इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला त्यांनी चिथविले. 42 पीडा देणार्यापासून त्यांनी केलेली त्यांची सुटका— त्यांच्या सामर्थ्याचे त्यांनी स्मरण केले नाही, 43 ज्या दिवशी त्यांनी इजिप्तमध्ये आपली चिन्हे प्रदर्शित केली, सोअनाच्या प्रदेशात त्यांनी चमत्कार केले. 44 त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रूपांतर रक्तात केले; त्यामुळे त्यांच्या जलप्रवाहातील पाणी पिता आले नाही. 45 सर्व इजिप्त देश खाऊन टाकण्यासाठी त्यांनी कीटकांचे थवेच्या थवे पाठविले आणि बेडकांनी सर्व विध्वंस करून टाकले. 46 त्यांनी त्यांची पिके सुरवंटांना खावयास दिली; त्यांचा हंगाम टोळांनी फस्त केला. 47 त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला. 48 त्यांनी त्यांची गुरे गारांनी नष्ट केली, विजेने त्यांची मेंढरे ठार झाली. 49 त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला. 50 त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले. 51 इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले; जे हामाच्या डेर्यातील पौरुषाचे प्रथमफळ होते. 52 पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून, त्यांना वाट दाखवित मेंढरांसारखे रानातून नेले, 53 त्यांनीच त्यांचे सुरक्षित मार्गदर्शन केले, म्हणून ते भयभीत झाले नाहीत; परंतु त्यांच्या शत्रूंना मात्र समुद्रात बुडवून टाकले. 54 त्यांनी आपल्या उजव्या हाताने त्यांना आपल्या पवित्र भूमीच्या सीमेवरील पर्वतीय देशात आणले. 55 त्यांनी राष्ट्रांना त्यांच्या समोरून काढून टाकले आणि त्यांची जमीन त्यांना सूत्राने मापून वतन म्हणून दिली; त्यांनी इस्राएलाच्या गोत्रास त्यांच्या घरात स्थायिक केले. 56 तरी त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि त्यांनी सर्वोच्च परमेश्वराविरुद्ध बंड केले; त्यांच्या आज्ञा पाळण्याचे नाकारले. 57 जसा एक सदोष धनुष्य दुसरीकडे वळतो, ते आपल्या पूर्वजांप्रमाणेच अविश्वासू आणि विश्वासघातकी झाले. 58 त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले. 59 त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले. 60 त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला, 61 त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले. 62 त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता. 63 त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही. 64 याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही. 65 झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा, तसे प्रभू जागे झाले; द्राक्षरसाच्या धुंदीमधून जागे झालेल्या योध्यासारखे ते उठले. 66 त्यांनी आपल्या शत्रूंची दाणादाण केली आणि त्यांची कायमची फजिती केली. 67 परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला; एफ्राईमचे गोत्र पसंत केले नाही. 68 तर त्यांनी यहूदाहचे गोत्र निवडले, त्यांना प्रिय असलेल्या सीयोन पर्वतास 69 त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले, आणि पृथ्वीसारखे त्यांनी कायमचे निश्चित केले. 70 त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. 71 मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली. 72 आणि दावीदाने प्रामाणिक अंतःकरणाने त्यांचे रक्षण केले; कुशल हातांनी त्याने त्यांचे नेतृत्व केले. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.