स्तोत्रसंहिता 76 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 76 संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. 1 परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत; इस्राएलमध्ये त्यांचे नाव थोर आहे. 2 त्यांचा मंडप शालेम येथे आहे, त्यांचे निवासस्थान सीयोन येथे आहे. 3 तिथे त्यांनी चमकणारे बाण, ढाली आणि तलवारी, युद्धाची शस्त्रे मोडली. सेला 4 तुम्ही प्रकाशाने तेजस्वी आहात, प्राण्यांनी समृद्ध असलेल्या पर्वतांपेक्षा अधिक वैभवी. 5 प्रबळांची लूटमार झाली आहे, ते मृत्यूची निद्रा घेत आहेत; त्यांच्यातील एकाही योद्ध्याला हात उचलता येत नाही. 6 हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत. 7 तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो? 8 स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला आणि ती स्तब्ध झाली— 9 पृथ्वीवरील पीडितांचे रक्षण करण्यासाठी, परमेश्वर उठून उभे राहिले तेव्हा असे झाले. सेला 10 खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले. 11 तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी. 12 कारण ते अधिपतींचा अभिमान नष्ट करतील; पृथ्वीवरील राजांकरिता ते भयावह आहेत. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.