स्तोत्रसंहिता 75 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 75 संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत 1 हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात. 2 तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो; मी सर्वांना रास्त न्याय देतो. 3 पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले, तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला 4 मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’ आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका. 5 आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका; आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ” 6 पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही. 7 मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्यास उंच करतात. 8 कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल. 9 मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन; मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन. 10 ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन, परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.