Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 73 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


तृतीय पुस्तक स्तोत्रसंहिता 73–89 स्तोत्र 73
आसाफाचे स्तोत्र.

1 निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत.

2 माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते; माझी पावले घसरण्याच्या बेतास आली होती.

3 कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.

4 होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.

5 इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत.

6 अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत.

7 त्यांच्या संवेदनशून्य अंतःकरणातून अपराधच निघतात; त्यांच्या मनातील दुष्ट कल्पनांना मर्यादा नाही.

8 ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात; गर्विष्ठपणामुळे ते दडपशाहीची धमकी देतात.

9 ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते.

10 म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि ते विपुल प्रमाणात पाणी पितात.

11 ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”

12 असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.

13 माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.

14 दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.

15 जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.

16 ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.

17 मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.

18 निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल.

19 क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.

20 जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल.

21 जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,

22 त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!

23 तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे.

24 तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.

25 स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही.

26 माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.

27 जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता.

28 परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan