स्तोत्रसंहिता 65 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 65 संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत. 1 हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल. 2 तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता, म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील. 3 आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली, तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली. 4 तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य! आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ. 5 तुमच्या अद्भुत आणि नीतिकार्याद्वारे तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देता, परमेश्वर, आमचे तारणकर्ता, पृथ्वीच्या टोकापर्यंत आणि दुर्गम समुद्रापर्यंत, तुम्ही सर्व भक्तांची आशा आहात. 6 आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे. 7 तुम्ही महासागराच्या खवळलेल्या लाटांना शांत करता आणि सर्व राष्ट्रांचे कोलाहल शांत करता. 8 संपूर्ण पृथ्वी तुमच्या महाकृत्याने विस्मित होते; सूर्योदय आणि सूर्यास्त ही आनंदाने जयघोष करीत आहेत. 9 तुम्ही या भूमीची काळजी घेता व ती सिंचनासाठी देता. आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत, कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे. 10 तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता; पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता. 11 तुम्ही तुमच्या औदार्यासह वर्षास शिरोभूषण चढविता आणि तुमच्या गाड्या समृद्धीने ओसांडत आहेत. 12 राने हिरव्यागार लुसलुशीत गवताने आच्छादून टाकता; टेकड्या आनंदाची वस्त्र परिधान करतात. 13 हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात आणि दर्यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते; ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.