स्तोत्रसंहिता 63 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 63 यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे. 2 तुमचे सामर्थ्य आणि गौरव मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे. 3 कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील. 4 माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन. 5 उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्या ओठांनी मी तुमची स्तुती करेन. 6 माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो. 7 कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो. 8 मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो. 9 जे मला मारू इच्छितात त्यांचा नाश होईल; ते पृथ्वीच्या खोल रसातळी जातील. 10 तलवारीच्या धारेने ते पडतील; कोल्ह्यांचे ते भक्ष्य होतील. 11 परंतु राजा परमेश्वरामध्ये उल्हास करेल; जे लोक परमेश्वराची शपथ घेतात, ते सर्व त्याचे गौरव होईल; परंतु लबाडांची तोंडे बंद होतील. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.