स्तोत्रसंहिता 62 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 62 संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. 1 परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते. 2 फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे. 3 तुम्ही सर्वजण या एका मनुष्याला खाली पाडावयास, कुठपर्यंत माझ्यावर प्रहार करीत राहणार? मी तर एका वाकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. 4 मला उच्च स्थानावरून खाली पाडण्याचा त्यांचा बेत आहे; त्यांना खोटे बोलणे आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, परंतु मनातून शाप देतात. सेला 5 तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे. 6 खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही. 7 माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत. 8 माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला 9 साधारण मानव श्वासमात्र आहेत; विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत; तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील; ते सर्व श्वासमात्र आहेत. 10 पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका; जरी तुमची संपत्ती वाढत असेल, तरी तिच्यावर मन लावू नका. 11 परमेश्वर एकदा बोलले आहेत, मी दोनदा हे ऐकले आहे: “सामर्थ्य याहवेहचेच आहे, 12 आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;” आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ देता.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.