स्तोत्रसंहिता 47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 47 संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. 1 अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा. 2 कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत. 3 त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले. 4 ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला 5 प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत, तुतार्यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत. 6 परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा. 7 कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत; त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा. 8 परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात; परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत. 9 जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.