स्तोत्रसंहिता 45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 45 संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. कोरहाच्या मुलांची रचना. एक मासकील. विवाह गीत. 1 माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे! राजाकरिता लिहिलेली कविता मी म्हणून दाखवितो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी बनली आहे. 2 तू पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे आणि तुझे ओठ कृपेने अभिषिक्त आहे, कारण परमेश्वराने तुला अनंतकाळासाठी आशीर्वादित केले आहे. 3 हे शूर वीरा, तू आपली तलवार बांध; तू वैभव व प्रताप धारण कर. 4 सत्य, नम्रता आणि न्याय यांच्या रक्षणाकरिता स्वारी कर आणि विजयशाली हो, तुझा उजवा हात तुला अद्भुत कृत्ये शिकवेल. 5 तुझे तीक्ष्ण बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात रुतले जाओ. राष्ट्रे तुझ्या पायात पडोत. 6 हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील. 7 तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे; म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, तुला हर्षाच्या तेलाने अभिषिक्त करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उच्चस्थळी स्थिर केले आहे. 8 तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात. 9 राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत; तुझ्या उजवीकडे राणी उभी असून तिने ओफीरच्या सोन्याचे दागिने घातले आहेत. 10 अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर. 11 तेव्हा राजा तुझ्या सौंदर्यात आनंद करेल; त्याचा आदर कर, कारण तो तुझा स्वामी आहे. 12 सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील. 13 राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे. 14 नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे. 15 राजमहालात प्रवेश करीत असताना, त्यांची मिरवणूक किती आल्हाददायक आणि हर्षपूर्ण वाटते. 16 तुझे पुत्र आपल्या पित्याप्रमाणे राजे होतील, जगातील सर्व सिंहासनावर ते बसतील. 17 सर्व पिढ्यांमध्ये तुझ्या नावाचे स्मरण होईल, असे मी करेन; जगातील राष्ट्रे सर्वकाळ तुझी स्तुती करतील. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.