Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 41
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.

1 जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य; याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील.

2 याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील— ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील— ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत.

3 ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.

4 मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा; मला रोगमुक्त करा, कारण मी तुमच्याविरुद्ध पातके केली आहेत.”

5 माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”

6 जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.

7 माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.

8 “त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात.

9 प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.

10 परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल.

11 तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही.

12 तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा.

13 इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो. आमेन आणि आमेन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan