स्तोत्रसंहिता 29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 29 दावीदाचे स्तोत्र. 1 अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या. 2 याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा. 3 याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे. 4 याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर. 5 याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात. 6 लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो; 7 याहवेहचा आवाज कडाडतो, विजा चमकल्यासारखा. 8 याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात. 9 याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.” 10 याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत. 11 याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.