स्तोत्रसंहिता 28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 28 दावीदाचे स्तोत्र. 1 याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन. 2 मी पवित्रस्थानाकडे माझे हात उंच करतो; साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो; माझी दयेची आरोळी ऐका. 3 दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते. 4 जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा. 5 कारण याहवेहच्या महान कृत्यांचे व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. याहवेहच त्यांचा नाश करतील. मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही. 6 याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे. 7 याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन. 8 याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत. 9 तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.