स्तोत्रसंहिता 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 2 1 राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत? 2 याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत, 3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.” 4 स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात. 5 ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात, 6 “सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.” 7 मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे. 8 माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल. 9 तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.” 10 म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा. 11 भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा. 12 त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.