स्तोत्रसंहिता 143 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 143 दावीदाचे एक स्तोत्र. 1 हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या. 2 आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही. 3 माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे; त्याने मला जमिनीवर तुडविले आहे; जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे, तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे. 4 माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे; भीतीने मी हतबल झालो आहे. 5 मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे. 6 मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो; शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला 7 हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्यासारखा होईन. 8 प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा. 9 याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे. 10 तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो. 11 हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा. 12 माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.