Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 141 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 141
दावीदाचे एक स्तोत्र.

1 हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.

2 तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो; माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.

3 हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.

4 माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका, पातक्यांच्या सहवासात राहून, कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा; त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा.

5 नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल; त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते. माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही, दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.

6 दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल; तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल.

7 ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात, तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत.”

8 परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे; तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.

9 दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा, त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा.

10 दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे, आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan