स्तोत्रसंहिता 132 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 132 प्रवाशांचे आराधना गीत. 1 हे याहवेह, दावीदाचे व त्याच्या स्वसुखत्यागाचे स्मरण करा. 2 त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला: 3 “मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन, 4 माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही, वा डुलकीही घेणार नाही, 5 जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.” 6 याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले, नंतर तो याआर प्रदेशात सापडला: 7 “चला आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊ, तिथे त्यांच्या चरणी त्यांची उपासना करू. 8 ‘हे याहवेह, उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह, तुमच्या विश्रामस्थानी या. 9 तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत; तुमचे भक्त आनंदघोष करोत.’ ” 10 तुमचा सेवक दावीदाकरिता तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका. 11 याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की, एक अशी शपथ जी ते कधीही मोडणार नाहीत: “तुझ्या वंशजांपैकी एकाला मी तुझ्या राजासनावर विराजमान करेन. 12 जर तुझे वंशज मी केलेल्या करारातील अटींचे व मी शिकविलेल्या आज्ञांचे पालन करतील, तर त्यांचे वंशजही सदासर्वकाळ तुझ्या राजासनावर विराजमान होतील.” 13 कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे, आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात, 14 “हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे; मी येथे विराजमान होईन, कारण येथेच राहण्याची माझी इच्छा आहे. 15 मी या नगरीची भरभराट करेन; तिच्यातील गरिबांना अन्न देऊन तृप्त करेन. 16 तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन, तेथील भक्त आनंदाने सदैव जयजयकार करतील. 17 “येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल आणि आपल्या अभिषिक्तासाठी मी एक दीप स्थापित करेन. 18 मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन, परंतु त्याचे मस्तक राजमुकुटाने गौरवमंडित होईल.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.