स्तोत्रसंहिता 119 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 119 א आलेफ़ א आलेफ़ 1 ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात, जे याहवेहच्या नियमानुसार आचरण करतात, ते सर्वजण धन्य होत. 2 जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत. 3 ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात. 4 तुमचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, म्हणूनच ते तुम्ही योजलेले आहेत. 5 अहा, तुमचे नियम पाळण्यास माझे आचरण नेहमी स्थिर असते तर किती बरे झाले असते! 6 मी तुमचे नियम पाळले, तर माझी फजिती होणार नाही. 7 जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन, तेव्हा सात्विक हृदयाने तुमचे उपकारस्मरण करेन. 8 मी तुमच्या विधींचे पालन करेन; माझा पूर्णपणे त्याग करू नका. ב बैथ ב बैथ 9 तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील? ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच. 10 तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे; त्या आज्ञेपासून मला बहकून जाऊ देऊ नका. 11 मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये. 12 हे याहवेह, तुमचे स्तवन होवो; तुमचे विधी मला शिकवा. 13 तुमच्या मुखातून निघालेले सर्व नियम आपल्या ओठांनी मी त्या सर्वांची पुनरुक्ती करतो. 14 तुमच्या नियमांचे पालन करण्यात मला असा अत्यानंद होतो, जसा अमाप धनसंपत्ती मिळाल्यावर होतो. 15 मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो. 16 मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो; मी तुमच्या वचनांची उपेक्षा करणार नाही. ג गिमेल ג गिमेल 17 मी जिवंत असेपर्यंत मला विपुल आशीर्वादित करा, म्हणजे मी तुमच्या वचनाचे पालन करीत राहीन. 18 तुमच्या नियमशास्त्रातील अद्भुत रम्य गोष्टी पाहण्यासाठी माझे डोळे उघडा. 19 या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे; तुमच्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेऊ नका. 20 तुमच्या नियमांची सतत लागलेली उत्कंठा मला कासावीस करते. 21 तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता. 22 त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. 23 अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात, तरी तुमचा सेवक तुमच्या विधींचे मनन करेल. 24 तुमचे नियम मला आनंददायी वाटतात; तेच माझे सल्लागार आहेत. ד दालेथ ד दालेथ 25 मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे; तुम्ही आपल्या वचनानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. 26 मी माझ्या मार्गाचे वर्णन केले आणि तुम्ही मला उत्तर दिले; तुमचे नियम मला शिकवा. 27 तुमच्या शिक्षणाची पद्धत मला समजू द्या, म्हणजे मी तुमच्या अद्भुत कृत्यांचे मनन करेन. 28 दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा. 29 असत्य मार्गापासून मला दूर ठेवा; तुमच्या कृपेनुसार आपल्या विधिनियमांचे मला शिक्षण द्या. 30 विश्वसनीय मार्गाची मी निवड केली आहे; तुमच्या नियमांवर मी आपले हृदय केंद्रित केले आहे. 31 याहवेह, मी तुमच्या आज्ञांना चिकटून राहतो, मला लज्जित होऊ देऊ नका. 32 मी तुम्ही आज्ञापिलेल्या मार्गावर धावत आहे, कारण तुम्ही माझी समज विस्तृत केली आहे. ה हे ה हे 33 हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे. 34 मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन. 35 तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा, कारण तेच मला आनंद देतात. 36 मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी, परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे. 37 निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा; तुमच्या मार्गानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. 38 तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा, म्हणजे तुमचे भय कायम राहील. 39 लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा, कारण तुमच्या आज्ञा उत्तम आहेत. 40 तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे! तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा. ו वाव ו वाव 41 हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो; 42 मग मला टोचून बोलणार्यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो. 43 तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे. 44 मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन. 45 मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत. 46 तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन आणि मी लज्जित केला जाणार नाही. 47 तुमच्या नियमात माझा आनंद आहे, कारण ते मला प्रिय आहेत. 48 मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन, जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन. ז ज़ईन ז ज़ईन 49 तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे; 50 माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते. 51 गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात, तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही. 52 याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते. 53 संताप मला व्यापून टाकतो, कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत. 54 मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत. 55 हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो, जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन. 56 तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे. ח ख़ेथ ח ख़ेथ 57 याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात; तुमचे नियम पालन करण्याचे मी वचन दिले आहे. 58 पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो; आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा. 59 माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत. 60 मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन. 61 दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही, मी तुमचे नियम विसरणार नाही. 62 मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन. 63 माझी मैत्री त्या सर्वांशी आहे, जे तुमचे भय धरतात व तुमचे आज्ञापालन करतात. 64 हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तुमचे नियम मला शिकवा. ט टेथ ט टेथ 65 हे याहवेह, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे, तुमच्या सेवकाचे कल्याण करा. 66 तुम्ही मला ज्ञान व विवेक शिकवा, कारण तुमच्या आज्ञांवर माझा पूर्ण विश्वास आहे. 67 पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो. 68 तुम्ही चांगले आहात आणि जे तुम्ही करता तेही भलेच असते; मला तुमचे विधिशिक्षण द्या. 69 गर्विष्ठ लोकांनी माझ्याविरुद्ध कुभांडे रचली आहेत, परंतु तुमचे नियम मी संपूर्ण अंतःकरणाने पाळतो. 70 त्यांची अंतःकरणे कठोर व संवेदनाहीन झाली आहेत, परंतु तुमच्या नियमशास्त्राने मी सुखावतो. 71 मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती, जेणेकरून मी तुमचे नियम शिकावे; 72 तुमच्या मुखातून निघालेले नियम, चांदी आणि सोने यांच्या हजारो नाण्यांपेक्षाही अधिक मोलाचे आहेत. י योध י योध 73 तुमच्या हातांनी मला घडविले आणि आकार दिला; आता तुमचे नियम समजण्यास मला सुबुद्धी द्या. 74 जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत, कारण मी तुमच्या वचनावर आशा ठेवली आहे. 75 हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली; 76 तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो; 77 मी जगावे म्हणून तुमची दया मला प्राप्त होवो कारण तुमचे नियम माझा आनंद आहेत. 78 गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे, परंतु मी तुमच्या नियमांचे मनन करेन. 79 तुमचे भय धरणारे व तुमचे नियम समजणारे, ते सर्वजण माझ्याकडे वळोत. 80 मी निर्दोष अंतःकरणाने तुमच्या विधींचे पालन करेन, म्हणजे मी कधीच लज्जित होणार नाही. כ काफ़ כ काफ़ 81 तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो. 82 तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?” 83 जरी मी धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा झालो आहे; तरी मी तुमचे नियम कधीही विसरत नाही. 84 तुमच्या सेवकाने किती काळ वाट पाहावी? माझा छळ करणार्यांना तुम्ही कधी शिक्षा कराल? 85 अहंकारी मला अडकविण्यासाठी खड्डे खणत आहेत, जे तुमच्या नियमाविरुद्ध आहे. 86 तुमच्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; तुम्ही मला साहाय्य करा, विनाकारण माझा छळ होत आहे. 87 त्यांनी पृथ्वीवरून मला जवळपास नामशेषच केले होते; तरी तुमचे नियम मी नाकारले नाही. 88 तुमच्या अक्षय प्रीतीस अनुसरून माझ्या जिवाचे रक्षण करा, म्हणजे तुमच्या मुखातून निघालेले नियम मला पाळता येतील. ל लामेध ל लामेध 89 हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे; ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते. 90 तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते; तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे. 91 तुमचे नियम आजवर अस्तित्वात आहेत, कारण सर्वकाही तुमची सेवा करतात. 92 जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते, तर पीडेने माझा केव्हाच अंत झाला असता. 93 मी तुमचे नियम कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्याद्वारे तुम्ही माझ्या जीवनाचे जतन केले आहे. 94 मी तुमचा आहे, माझे तारण करा; कारण मी तुमच्या विधीचा शोधक आहे. 95 दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत, तरी मी माझे चित्त तुमच्या अधिनियमाकडे लावेन. 96 प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते, परंतु तुमच्या आज्ञा निस्सीम आहेत. מ मेम מ मेम 97 अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो. 98 तुमची वचने सतत माझ्यासह असतात, आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात. 99 मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो. 100 मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. 101 दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन. 102 मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे. 103 किती मधुर आहेत तुमची वचने, माझ्या मुखात ती मला मधापेक्षाही गोड लागतात! 104 तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो. נ नून נ नून 105 तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे. 106 मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन. 107 याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझे जतन करा. 108 याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा. 109 जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही. 110 दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही. 111 तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत, माझ्या अंतःकरणाचा उल्हास आहेत. 112 शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे. ס सामेख ס सामेख 113 दुटप्पी लोकांचा मला तिरस्कार वाटतो, पण मला तुमचे नियम प्रिय आहेत. 114 तुम्ही माझा आश्रय व माझी ढाल आहात; तुमच्या अभिवचनांवर मी आशा ठेवली आहे. 115 अहो कुकर्मी लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा, जेणेकरून माझ्या परमेश्वराच्या आज्ञांचे मी पालन करेन. 116 हे परमेश्वरा, तुमच्या अभिवचनानुसार माझे जतन करा, म्हणजे मी जिवंत राहीन; माझी आशाभंग होऊ देऊ नका. 117 मला उचलून धरा म्हणजे माझी सुटका होईल; मी तुमच्या नियमांचा नेहमी आदर करतो. 118 जे तुमच्या नियमापासून पथभ्रष्ट होतात, त्यांना तुम्ही नाकारले आहे, त्यांचा संभ्रम निरर्थक ठरू द्या. 119 पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तुम्ही एखाद्या गाळाप्रमाणे टाकून देता; म्हणूनच तुमचे नियम मला प्रिय आहेत. 120 तुमच्या भीतीने माझा देह थरथर कापतो; मला तुमच्या विधिनियमाचा दरारा वाटतो. ע अयिन ע अयिन 121 मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे; माझा छळ करणार्यांच्या हाती मला सोपवू नका. 122 आपल्या सेवकाचे कल्याण सुनिश्चित करा; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नका. 123 माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता माझे डोळे अंधुक झाले आहेत. 124 आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा आणि मला तुमचे नियम शिकवा. 125 मी तुमचा दास आहे; मला विवेकबुद्धी द्या, म्हणजे तुमचे नियम समजतील. 126 हे याहवेह, तुम्ही कृती करण्याची वेळ आली आहे; तुमच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. 127 कारण मी तुमच्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावन्नकशी सोन्यापेक्षाही अधिक प्रिय मानतो, 128 कारण तुमचा प्रत्येक नियम यथायोग्य मानतो; म्हणून सर्व असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. פ पे פ पे 129 तुमचे नियम अद्भुत आहेत; म्हणून मी त्यांचे पालन करतो. 130 तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते. 131 माझे मुख उघडून मी धापा टाकल्या, कारण तुमच्या आदेशाची मला आस लागली होती. 132 मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा, जशी तुमच्या नामावर प्रीती करणार्यांवर तुम्ही नेहमी करता, तशी करा. 133 तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा, म्हणजे पाप मजवर सत्ता गाजविणार नाही. 134 मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील. 135 तुमच्या सेवकावर आपला मुखप्रकाश पडू द्या, आणि तुमचे सर्व नियम मला शिकवा. 136 माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. צ त्सादे צ त्सादे 137 हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात, आणि तुमचे नियमही अचूक आहेत. 138 तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत. 139 माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात. 140 तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत. 141 मी स्वतः महत्त्वहीन व तिरस्कृत असलो, तरी तुमचे नियम मी विसरत नाही. 142 तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे, आणि तुमचे नियम सत्य आहेत. 143 संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे, परंतु तुमच्या आज्ञा मला सुखावतात. 144 तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन. ק क़ौफ़ ק क़ौफ़ 145 हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या, म्हणजे मी तुमच्या नियमांचे पालन करेन. 146 मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा म्हणजे मी तुमच्या आज्ञा पाळू शकेन. 147 सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे. 148 मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन. 149 तुमच्या वात्सल्य-कृपेनुसार माझी प्रार्थना ऐका; याहवेह, तुमच्या वचनानुरुप माझे जतन करा. 150 माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत, पण ते तुमच्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. 151 परंतु हे याहवेह, तुम्ही माझ्याजवळ आहात, व तुमच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. 152 अनेक वर्षापूर्वी तुमच्या अधिनियमांबद्दल मी हे शिकलो आहे की, ते तुम्ही सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. ר रेश ר रेश 153 माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही. 154 माझ्या वादाचे समर्थन करा आणि माझी सुटका करा; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या जीवनाचे जतन करा. 155 दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत. 156 हे याहवेह, तुमची दया किती महान आहे; तुमच्या नियमानुसार माझे जतन करा. 157 मला छळणारे कितीतरी शत्रू आहेत, पण मी तुमचा आज्ञाभंग केला नाही. 158 मला या विश्वासघातक्यांचा वीट आला आहे, कारण ते तुमच्या वचनाचे पालन करीत नाहीत. 159 याहवेह पाहा, मी तुमच्या आज्ञांवर किती मनापासून प्रीती करतो; तुमच्या वात्सल्यानुरूप माझी जोपासना करा. 160 तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत. ש शीन ש शीन 161 अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला, परंतु माझे हृदय केवळ तुमच्याच वचनांनी कंपित होते. 162 मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो, तसा मला तुमच्या अभिवचनांनी आनंद होतो. 163 असत्याचा मी द्वेष व घृणा करतो, पण तुमच्या नियमांवर मी प्रीती करतो. 164 तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल दिवसातून सात वेळा मी तुमचे स्तवन करतो. 165 जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत. 166 याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो, आणि मी तुमच्या आज्ञा पाळतो. 167 मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो, कारण त्या मला अतिशय प्रिय आहेत. 168 मी तुमचे उपदेश व नियम पाळतो, कारण माझा प्रत्येक मार्ग तुम्हाला माहीत आहे. ת ताव ת ताव 169 हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो; आपल्या वचनाप्रमाणे मला विवेकवंत करा. 170 माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो; तुम्ही आपल्या अभिवचनाप्रमाणे माझी सुटका करा. 171 माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो, कारण तुम्ही मला तुमचे विधी शिकविले आहेत. 172 माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ, कारण तुमचे सर्व नियम नीतियुक्त आहेत. 173 मला साहाय्य करण्यास तुमची भुजा सतत तयार राहो, कारण मी तुमच्या अधिनियमांचा स्वीकार केला आहे. 174 हे याहवेह, मी तुमच्या तारणाची उत्कंठा धरलेली आहे; तुमचे नियम माझा अत्यानंद देतात. 175 मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत. 176 हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.