नीतिसूत्रे 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीकोणतीही किंमत देऊन ज्ञान प्राप्त कर 1 माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका; त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा. 2 मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो, म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका. 3 कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो, अजूनही सुकुमार आणि आईच्या प्रेमात वाढलेला. 4 तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले, “तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल. 5 सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर; माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस. 6 सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल. 7 सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव. 8 तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल; 9 ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल, आणि एक सुशोभित मुकुट तुला सादर करेल.” 10 माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. 11 मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो. 12 जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस. 13 बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे. 14 दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्यांच्या मार्गाने जाऊ नकोस. 15 त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा, 16 कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. 17 दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात. 18 नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे. 19 दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही. 20 माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे; माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव. 21 त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस; त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव; 22 कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात. 23 सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते. 24 सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे. 25 तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव. 26 तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा. 27 उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.