नीतिसूत्रे 24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीविसावे सूत्र 1 दुर्जनांचा मत्सर करू नका, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका; 2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात. एकविसावे सूत्र 3 सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते; 4 ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात. बाविसावे सूत्र 5 सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात. 6 लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते, कारण अनेक सल्लागारांद्वारे विजय प्राप्त होते. तेविसावे सूत्र 7 सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते; वेशीतील सभेत त्यांनी आपले तोंड उघडू नये. चोविसावे सूत्र 8 जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील. 9 मूर्खाच्या योजना म्हणजे पाप, आणि लोक टवाळखोर मनुष्याचा द्वेष करतात. पंचविसावे सूत्र 10 जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे! 11 ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; जे लटपटणार्या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव. 12 जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का? सव्विसावे सूत्र 13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे; आणि पोळ्यातून पाझरणारे मध तुझ्या जिभेला गोड लागेल. 14 त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही. सत्ताविसावे सूत्र 15 चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको; 16 कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात. अठ्ठाविसावे सूत्र 17 जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये, 18 नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील. एकोणतिसावे सूत्र 19 वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका, 20 कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल. तिसावे सूत्र 21 माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्यांना सहभागी होऊ नकोस, 22 कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे? सुज्ञ व्यक्तीची पुढील वचने 23 ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत: न्यायदान करताना पक्षपात दाखविणे हे चांगले नाहीच: 24 जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्याचा धिक्कार करतील. 25 परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल. 26 प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे. 27 तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध. 28 विनाकारण तुझ्या शेजार्याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय? 29 असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.” 30 एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो; 31 सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते. 32 जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो: 33 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— 34 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.