Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


वल्हांडण सण

1 इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले,

2 “इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा.

3 नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.”

4 तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.

5 त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

6 परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.

7 आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?”

8 मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”

9 मग याहवेहने मोशेला म्हटले,

10 “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,

11 परंतु त्यांनी तो दुसर्‍या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे.

12 त्यांनी दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत.

13 पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल.

14 “ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्‍या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ”


निवासमंडपावरील मेघ

15 ज्या दिवशी निवासमंडप, कराराच्या नियमाचा मंडप उभारण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याला झाकून टाकले. संध्याकाळपासून सकाळपर्यंत निवासमंडपावरील मेघ अग्नीसारखे दिसू लागले.

16 आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले.

17 जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत.

18 याहवेहच्या आज्ञेनुसार इस्राएली लोक प्रवासास निघत असत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत. जोपर्यंत निवासमंडपावर मेघ थांबत असे तोपर्यंत ते तळ देऊन राहत असत.

19 जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत.

20 कधीकधी मेघ काहीच दिवस निवासमंडपावर थांबत असे, तेव्हा याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देऊन राहत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात.

21 कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी जेव्हा तो वरती घेतला जाई, लोक पुढे जात. तो दिवस असो किंवा रात्र, जेव्हा मेघ वरती घेतला जात असे, ते पुढे निघत असत.

22 निवासमंडपावर मेघ दोन दिवस थांबून राहो किंवा एक महिना किंवा एक वर्ष राहो, इस्राएली लोक आपल्या छावणीत राहत आणि पुढे जात नसत; परंतु जेव्हा मेघ वर घेतला जाई, ते पुढे जात.

23 याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan