Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


निवासमंडपाच्या समर्पणाच्या वेळी दिलेली अर्पणे

1 जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.

2 मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.

3 त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.

4 याहवेहने मोशेला म्हटले,

5 “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”

6 तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.

7 गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.

8 आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

9 कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.

10 जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.

11 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”

12 पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.

13 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

14 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.

15 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;

16 पापार्पणासाठी एक बोकड;

17 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ही अम्मीनादाबाचा पुत्र नहशोनाची अर्पणे होती.

18 दुसर्‍या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.

19 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

20 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

21 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

22 पापार्पणासाठी एक बोकड;

23 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सूवाराचा पुत्र नथानेलाचे हे अर्पण होते.

24 तिसर्‍या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले.

25 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

26 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

27 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

28 पापार्पणासाठी एक बोकड;

29 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. हेलोनचा पुत्र एलियाबाचे हे अर्पण होते.

30 चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.

31 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

32 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

33 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

34 पापार्पणासाठी एक बोकड;

35 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. शेदेऊरचा पुत्र एलीसूराचे हे अर्पण होते.

36 पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.

37 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

38 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

39 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

40 पापार्पणासाठी एक बोकड;

41 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाचे हे अर्पण होते.

42 सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.

43 त्याचे अर्पण असे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

44 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

45 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

46 पापार्पणासाठी एक बोकड;

47 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. देउएलाचा पुत्र एलीआसाफाचे हे अर्पण होते.

48 सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले.

49 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

50 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

51 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

52 पापार्पणासाठी एक बोकड;

53 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाचे हे अर्पण होते.

54 आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.

55 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

56 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

57 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

58 पापार्पणासाठी एक बोकड;

59 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे. पदहसूरचा पुत्र गमलीएलचे हे अर्पण होते.

60 नवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले.

61 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

62 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

63 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

64 पापार्पणासाठी एक बोकड;

65 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. गिदोनीचा पुत्र अबीदानाचे हे अर्पण होते.

66 दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले.

67 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

68 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

69 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

70 पापार्पणासाठी एक बोकड;

71 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजराचे हे अर्पण होते.

72 अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले.

73 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

74 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

75 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

76 पापार्पणासाठी एक बोकड;

77 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ओक्रानाचा पुत्र पगीयेलाचे हे अर्पण होते.

78 बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.

79 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

80 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

81 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

82 पापार्पणासाठी एक बोकड;

83 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. एनानाचा पुत्र अहीराचे हे अर्पण होते.

84 जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्‍यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.

85 चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.

86 धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.

87 होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्‍हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.

88 शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्‍हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती.

89 जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan