गणना 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीनाजीरासंबंधी नियम 1 मग याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात, 3 तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत. 4 जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये. 5 “ ‘नाजीरपणाच्या संपूर्ण काळात त्यांच्या डोक्यावर वस्तरा फिरवू नये. त्यांनी याहवेहला समर्पित केलेला नवसाच्या काळ संपेपर्यंत त्यांनी पवित्र असावे; त्यांनी आपले केस लांब वाढू द्यावेत. 6 “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये. 7 त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे. 8 समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत ते याहवेहसाठी पवित्र आहेत. 9 “ ‘जर नाजीराच्या समक्षतेत कोणी अचानक मरण पावला, तर त्यांच्या डोक्यावरील केस, समर्पणाचे प्रतीक विटाळले जाते, त्यावेळी सातव्या दिवशी; शुद्धीकरणाच्या दिवशी त्यांनी आपले मुंडण करावे. 10 मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी. 11 मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे. 12 आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले. 13 “ ‘आणि त्यांचा समर्पणाचा काळ संपल्यानंतर नाजीरांसाठी हा नियम असावा. त्यांना सभामंडपाच्या दाराशी आणावे, 14 त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्हा आणावा. 15 त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या. 16 “ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे. 17 याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्हाचा यज्ञ करावा. 18 “ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे. 19 “ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी. 20 नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो. 21 “ ‘हा नाजीराचा नियम आहे, जे आपल्या समर्पणानुसार याहवेहला अर्पण करण्याचा नवस करतात, त्या खेरीज त्यांना परवडेल त्यानुसार आणावे. नाजीराच्या नियमानुसार केलेले नवस त्यांनी पूर्ण केले पाहिजे.’ ” याजकीय आशीर्वाद 22 याहवेह मोशेला म्हणाले, 23 अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे: 24 “ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो; 25 याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो; 26 याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’ 27 “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.