Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


कोहाथी

1 याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले:

2 “लेवींच्या शाखेतील कोहाथी लोकांची त्यांच्या कुळांनुसार व घराण्यानुसार जनगणना करा.

3 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी.

4 “सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे.

5 ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.

6 मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे.

7 “समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.

8 त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

9 “यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.

10 मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे.

11 “मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

12 “पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी.

13 “कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी.

14 मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

15 “नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.

16 “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”

17 याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले,

18 “कोहाथी गोत्राच्या कुळाचा लेव्यांमधून नाश होऊ नये,

19 आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे.

20 परंतु कोहाथी लोकांनी पवित्र वस्तू पाहण्यासाठी एक क्षणभरही आत जाऊ नये. नाहीतर ते मरण पावतील.”


गेर्षोनी

21 याहवेह मोशेला म्हणाले,

22 गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.

23 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी.

24 “वाहून नेणे व त्यांची इतर कामे करणे, ही गेर्षोनी कुळांची सेवा आहे:

25 त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा.

26 निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्‍या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्‍यात.

27 गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.

28 सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.


मरारी कूळ

29 “मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी.

30 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती करावी.

31 सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या,

32 त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्‍या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी.

33 अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”


लेव्यांच्या कुळांची गणती

34 मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्‍यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

35 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

36 त्यांची संख्या कुळांनुसार 2,750 होती.

37 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

38 गेर्षोनी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

39 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

40 त्यांचे कूळ व घराणे यानुसार ते 2,630 होते.

41 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

42 मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

43 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

44 त्यांच्या कुळानुसार ते 3,200 गणले गेले.

45 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

46 मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

47 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

48 त्यांची संख्या 8,580 भरली.

49 याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आपले काम व त्यांनी काय वाहून न्यावे हे नेमून देण्यात आले. अशाप्रकारे याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाची गणती करण्यात आली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan