गणना 34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीकनान देशाच्या सीमा 1 याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात: 3 “ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी, 4 तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी. 5 आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल. 6 तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी. 7 तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी. 8 आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी. 9 जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल. 10 तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी. 11 तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ समुद्रापर्यंत पोहोचेल. 12 नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’ “ ‘प्रत्येक दिशेने त्याच्या सीमा असलेला हाच तुमचा देश असेल.’ ” 13 मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा, 14 कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे. 15 या अडीच गोत्रांना त्यांचे वतन यरीहोजवळ, यार्देनच्या अलीकडे पूर्वेच्या बाजूला मिळाले आहे.” 16 याहवेह मोशेला म्हणाले, 17 “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ. 18 आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा. 19 “ही त्यांची नावे आहेत: “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब; 20 शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल; 21 बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद; 22 दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता. 23 योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता. 24 योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता. 25 जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता. 26 इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता. 27 आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता. 28 नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.” 29 इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.