गणना 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीमिर्याम व अहरोनाचा मोशेला विरोध 1 मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. 2 त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले. 3 (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.) 4 याहवेह लगेचच मोशे, अहरोन आणि मिर्यामला म्हणाले, “तुम्ही तिघेही सभामंडपाकडे बाहेर या.” तेव्हा ते तिघे बाहेर गेले. 5 मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले, 6 याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो. 7 परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे. 8 मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?” 9 मग याहवेहचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला आणि याहवेह त्यांना सोडून निघून गेले. 10 जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते, 11 तेव्हा तो मोशेला म्हणाला, “माझे स्वामी, मी तुला विनंती करतो, कृपया, आम्ही मूर्खपणाने केलेले पाप आमच्याविरुद्ध मोजू नको. 12 जसे एक तान्हे मृत बाळ आपल्या आईच्या उदरातून जन्माला येताच त्याचे अर्धे शरीर नष्ट झालेले असते, असे तिला राहू देऊ नको.” 13 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!” 14 तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा पिता तिच्या तोंडावर थुंकला असता, तर तिला सात दिवस लाजेने घालवावे लागले असते की नाही? तिला सात दिवस छावणीच्या बाहेर वेगळे राहू दे, त्यानंतर तिला परत आणावे.” 15 मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही. 16 यानंतर त्यांनी हसेरोथ सोडले आणि पारान नावाच्या रानात तळ दिला. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.