नहेम्या 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता सर्व लोक जल वेशीसमोरील चौकात एकत्र जमले. आणि त्यांनी नियम शिकविणारा शिक्षक एज्राला विनंती केली की याहवेहने इस्राएली लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्र त्याने बाहेर आणून सर्वांना वाचून दाखवावे. 2 तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एज्रा याजक मोशेचे नियमशास्त्र घेऊन बाहेर आला. ते कळण्यास समर्थ असलेले सर्व स्त्री-पुरुष सभेत एकत्र जमा झाले. 3 सकाळपासून दुपारपर्यंत त्याने जल वेशीसमोरील चौकाच्या दिशेने आपले मुख करून समजण्यास समर्थ असे जितके लोक होते त्यासर्वांच्या समक्षतेत वाचन केले. सर्व लोकांनी नियमशास्त्र लक्षपूर्वक ऐकले. 4 त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्याह व मशुल्लाम हे उभे होते. 5 एज्राने पुस्तक उघडले. प्रत्येकजण त्याला पाहू शकत होता, कारण तो इतरांपेक्षा जास्त उंचीवर उभा होता; तो उघडीत असताना सर्वजण उभे राहिले 6 नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले “आमेन! आमेन!” आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली. 7 लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली. 8 ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते. 9 मग राज्यपाल नहेम्याह, एज्रा याजक व शास्त्राचा शिक्षक व लोकांना शिकविणारे लेवी सर्व लोकांना म्हणाले, “याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आजचा दिवस पवित्र आहे. तुम्ही विलाप करू नये वा रडू नये.” कारण लोक नियमशास्त्रातील वचने ऐकत असताना सर्वजण रडत होते. 10 नहेम्याह म्हणाला, “जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.” 11 लेव्यांनी लोकांना शांत केले. ते म्हणाले, “तुम्ही शांत राहा, कारण हा पवित्र दिवस आहे. दुःख करू नका.” 12 म्हणून लोक मिष्टान्ने करून खाण्या-पिण्यासाठी आणि ताटे वाढून पाठविण्यासाठी गेले. तो दिवस मोठ्या आनंदाने उत्सव करण्याचा होता, कारण त्यांना देण्यात आलेले वचन आता त्यांना समजले होते. 13 महिन्याच्या दुसर्या दिवशी सर्व कुलप्रमुख, याजक आणि लेवी नियमशास्त्राचे अधिक काळजीपूर्वकरित्या वाचन ऐकण्यासाठी एज्रा शिक्षकाकडे एकत्र आले. 14 नियम ऐकत असताना, त्यांच्या निदर्शनास आले ते हे, याहवेहने मोशेला सांगितले होते की सातव्या महिन्यात येणार्या मंडपांच्या सणाच्या काळात इस्राएली लोकांनी तात्पुरत्या मांडवात राहावे. 15 देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.” 16 तेव्हा लोक बाहेर पडले आणि डाहळ्या तोडून आपल्या घरांच्या धाब्यांवर, आपल्या अंगणात, परमेश्वराच्या भवनाच्या अंगणात, जल वेशीच्या जवळील चौकात आणि एफ्राईम वेशींच्या चौकात त्यांनी तात्पुरते मांडव घातले. 17 या मांडवामध्ये बंदिवासातून परत आलेले सर्वजण सणाचे सात दिवस राहिले. नूनाचा पुत्र येशूआ याच्या काळापासून हा सण इस्राएली लोकांनी अशा प्रकारे साजरा केलेला नव्हता. प्रत्येकाचा आनंद खूप मोठा होता. 18 सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.