Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

नहेम्या 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


अर्तहशश्त नहेम्याहास यरुशलेमाला पाठवितो

1 पुढे अर्तहशश्तच्या राजवटीच्या विसाव्या वर्षी, निसान महिन्यामध्ये एके दिवशी, राजाला द्राक्षारस देण्यात आला, तेव्हा मी प्याला भरला व राजाला दिला. आजपर्यंत मी राजाच्या उपस्थितीत कधीही दुःखी असा दिसलो नव्हतो.

2 म्हणून राजाने मला विचारले, “तू आजारी नसताना तुझा चेहरा एवढा खिन्न का दिसतो? तुझ्या मनात निराशा असल्याशिवाय असे होणार नाही.” मी घाबरलो,

3 पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.”

4 राजाने मला विचारले, “तुझी काय इच्छा आहे?” स्वर्गातील परमेश्वराची मनात प्रार्थना करून मी उत्तर दिले,

5 “महाराज प्रसन्न असतील आणि त्यांचा सेवक शाही मर्जीतील असेल, तर जिथे माझ्या पूर्वजांना दफन केले आहे त्या नगराची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराजांनी मला यहूदीयाला पाठवावे.”

6 नंतर राजाच्या शेजारी राणी बसलेली असताना, राजाने मला विचारले, “किती काळासाठी तुला जावे लागेल व तू केव्हा परत येशील?” मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले म्हणून मी माझ्या जाण्याची वेळ ठरविली.

7 पुढील गोष्टींसाठी देखील मी विनंती केली, “महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर कृपा करून फरात नदीच्या पश्चिमेकडील राज्यपालांसाठी मजजवळ पत्रे द्यावी, म्हणजे त्यांनी मला त्यांच्या प्रांतातून यहूदीयाला सुखरुपपणे प्रवास करू द्यावा.

8 एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्‍या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या.

9 मी फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतात पोहोचलो, तेव्हा मी राजाची पत्रे तेथील राज्यपालांना दिली. राजाने माझ्या संरक्षणासाठी लष्करी अधिकारी व घोडेस्वार सैनिक माझ्याबरोबर पाठविले होते.

10 पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे.


नहेम्याह यरुशलेमच्या तटबंदीची पाहणी करतो

11 यरुशलेमला पोहोचल्यावर तिथे तीन दिवस राहिल्यानंतर,

12 मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता.

13 आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो.

14 पुढे आम्ही झर्‍याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती.

15 म्हणून रात्र झाल्यावर आम्ही शहराला वळसा घातला आणि मी ओहोळाच्या वाटेने वर चढून कोटाचे निरीक्षण केले व परत खोरेवेशीने आत आलो.

16 शहरातील अधिकार्‍यांना, मी कुठे गेलो व काय केले याची गंधवार्ताही नव्हती, कारण आतापर्यंत मी माझ्या योजनांबद्दल यहूदी, याजक किंवा प्रतिष्ठित नागरिक वा अधिकारी या कोणाशीही बोललो नव्हतो. नव्हे. जे प्रत्यक्ष काम करणार होते, त्यांच्याशी देखील बोललो नव्हतो.

17 मग मी त्यांना सांगितले, “आपल्या शहराची दुर्दशा तुम्हा सर्वांना माहीतच आहे: यरुशलेम उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याच्या वेशी जळालेल्या आहेत. आपण यरुशलेमच्या तटाची पुनर्बांधणी करू आणि आपल्यावरील हा कलंक धुऊन टाकू.”

18 परमेश्वराची हस्तकृपा माझ्यावर असून, तसेच माझे राजाशी झालेले बोलणे आणि माझ्या योजनेला त्याने दिलेली संमती, या गोष्टीही मी त्यांना सांगितल्या. त्यांनी उत्तर दिले, “आपण तटाची पुनर्बांधणी सुरू करू या.” आणि अशा रीतीने त्यांनी या सत्कार्याला सुरुवात केली.

19 पण होरोनी सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीयाह आणि गेशेम अरबी यांनी आमच्या या योजनेबद्दल ऐकले, तेव्हा ते आमची थट्टा व उपहास करून म्हणाले, “हे तुम्ही काय करीत आहात? राजाविरुद्ध बंड करता काय?”

20 पण मी उत्तर दिले, “स्वर्गाचे परमेश्वर आम्हाला यश देतील. आम्ही त्यांचे सेवक या तटाची पुनर्बांधणी करू, परंतु यरुशलेममध्ये वा त्यातील ऐतिहासिक कार्यात तुमचा काहीही सहभाग व अधिकार असणार नाही.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan