Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मीखाह 7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इस्राएलची दुर्दशा

1 काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.

2 पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे; एकही प्रामाणिक मनुष्य उरला नाही. प्रत्येकजण रक्तपात करण्यात गुंतला आहे; ते सापळा रचून एकमेकांची शिकार करतात.

3 वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; शासक भेटवस्तूंची मागणी करतो, न्यायाधीश लाच घेतात, सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; ते सर्व मिळून कट रचतात.

4 त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.

5 शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर.

6 कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते— मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात.

7 मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.


इस्राएल उठेल

8 अरे माझ्या वैर्‍या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. जरी मी अंधारात बसलो, तरी याहवेह माझा प्रकाश होतील.

9 मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, ते माझी बाजू ऐकून मला न्याय देईपर्यंत मी याहवेहचा कोप सहन करेन. ते मला प्रकाशात आणतील; आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन.

10 मग माझे शत्रू हे पाहून ते लज्जेने झाकले जातील, ती जी मला म्हणत होती, “याहवेह तुझा परमेश्वर कुठे आहे?” माझे डोळे तिचे पतन पाहतील; रस्त्याच्या चिखलाप्रमाणे तीही पायाखाली तुडविली जाईल.

11 तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल, आणि तुमच्या सीमा विस्तारित करण्याचा दिवस येईल.

12 अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत आणि मिसरपासून फरात नदीपर्यंत, समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि डोंगरांपासून डोंगरांपर्यंत, त्या दिवशी लोक तुझ्याकडे येतील.

13 पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल.


प्रार्थना आणि स्तुती

14 आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो, जो तुझ्या वतनाचा कळप आहे, जो एकटाच जंगलात, सुपीक कुरणात राहतो. त्यांना पूर्वीप्रमाणे बाशानात व गिलआदात यथेच्छ चरू द्या.

15 “तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.”

16 राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील.

17 ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.

18 तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.

19 पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल; तुम्ही आमची पापे आपल्या पायाखाली तुडविणार; आणि आमची दुष्कृत्ये समुद्राच्या खोलीत फेकून द्याल.

20 फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan