Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मीखाह 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


याहवेहचा इस्राएलशी वाद

1 याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको.

2 “हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.

3 “हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या.

4 मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.

5 माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”

6 मी याहवेहसमोर काय आणावे आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन त्यांच्यासमोर येऊ का?

7 एक हजार मेंढे किंवा जैतून तेलाच्या दहा हजार नद्यांनी याहवेह संतुष्ट होतील काय? माझ्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मी माझा ज्येष्ठपुत्र अर्पावा काय, माझ्या आत्म्याच्या पापासाठी माझ्या शरीराचे फळ द्यावे काय?

8 हे मनुष्या, त्यांनी तुला चांगले काय ते दाखविले आहे. आणि याहवेह तुझ्याकडून काय अपेक्षा करतात? नीतीने वागणे आणि दयेने प्रीती करणे आणि तुझ्या परमेश्वराबरोबर नम्रपणे चालणे.


इस्राएलचा दोष व शासन

9 ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका.

10 हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, आणि उणे एफा माप जे शापित आहे त्यास विसरेन काय?

11 चुकीच्या वजनाच्या पिशवीने, कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय?

12 तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; तुमचे रहिवासी लबाड आहेत आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते.

13 म्हणून तुमच्या पातकांमुळे तुमचा नायनाट व नाश करण्यास मी सुरुवात केली आहे.

14 तू खाशील तृप्त होणार नाही; खाल्ल्यानंतरही तुझे पोट रिकामे राहील. तू साठवून ठेवशील, पण काहीही उरणार नाही, कारण मी तुझी बचत तलवारीला देईन.

15 तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही.

16 तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan