मत्तय 17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीयेशूंचे रूपांतर 1 सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले; 2 तिथे त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले, त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. 3 त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. 4 तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.” 5 पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!” 6 ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले. 7 पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!” 8 जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही. 9 ते डोंगरावरून खाली उतरत असताना येशूंनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जे काही पाहिले, ते मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” 10 शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?” 11 येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. 12 पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आधीच आलेला आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.” अशाच प्रकारे मानवपुत्रालाही त्यांच्या हातून यातना भोगावयास लागतील. 13 तेव्हा येशू बाप्तिस्मा करणार्या योहानाविषयी बोलत आहेत, हे शिष्यांच्या लक्षात आले. फेपरेकरी मुलास बरे करणे 14 जेव्हा ते समुदायाकडे आले, त्यातील एक मनुष्य येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, 15 “प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी आहे आणि त्यामुळे त्याला फार यातना भोगाव्या लागतात. तो वारंवार अग्नीत नाही तर पाण्यात पडतो. 16 मी मुलाला तुमच्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना बरे करता आले नाही.” 17 येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी सहन करू? त्या मुलाला माझ्याकडे आणा.” 18 मग येशूंनी त्या मुलामधील दुरात्म्याला धमकावून घालवून दिले व त्या क्षणापासून तो मुलगा बरा झाला. 19 मग येशूंच्या शिष्यांनी त्यांच्याकडे एकांतात येऊन त्यांना विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?” 20 येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू इथून पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही. 21 असा प्रकार प्रार्थना व उपास याद्वारेच जाऊ शकतो. आपल्या मृत्यूविषयी येशू दुसर्यांदा भविष्य करतात 22 ते गालीलात एकत्र आले असताना, येशूंनी शिष्यांना सांगितले, “मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती दिले जाईल. 23 ते त्याला जिवे मारतील. पण तिसर्या दिवशी तो पुन्हा जिवंत केला जाईल.” हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व्यापून गेली. मंदिराचा कर 24 येशू व त्यांचे शिष्य कफर्णहूमात आल्यानंतर, दोन द्राह्मा मंदिर कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरीत नसतात काय?” 25 “अर्थात् ते कर भरीत असतात,” पेत्राने उत्तर दिले. मग पेत्र घरात गेला, तेव्हा तो काही बोलण्या आधी येशूंनी त्याला विचारले, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीचे राजे कर कसे गोळा करतात; स्वतःच्या लेकरांकडून की इतर लोकांकडून?” 26 “इतर लोकांकडून,” पेत्राने उत्तर दिले. “लेकरे कर भरण्यापासून मुक्त आहेत.” तेव्हा येशू म्हणाले 27 “पण आपण अडखळण होऊ नये, म्हणून सरोवराच्या किनार्यावर जा व तुझा गळ टाक आणि प्रथम जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड आणि त्यात तुला चार द्रह्माचे नाणे मिळेल. ते घे आणि माझ्यासाठी व तुझ्यासाठी कर भर.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.